KAANMS ARTS, COMMERCE & SCIENCE COLLEGE Latest News,Recent Events इतिहास विभाग आयोजित शिवजयंती निमित्त प्रा. डॉ. महेश वाघ यांचे व्याख्यान

इतिहास विभाग आयोजित शिवजयंती निमित्त प्रा. डॉ. महेश वाघ यांचे व्याख्यान



आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत शिवजयंती साजरी होत राहणार-

प्रा. डॉ. महेश वाघ

येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मन्साराम सोनवणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, इतिहास विभागाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव रूपाने साजरी करण्यात आली. यावेळी शिव व्याख्याते प्रा. डॉ. महेश वाघ यांनी *शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग व विज्ञाननिष्ठा* या विषयावर व्याख्यान देताना शिवाजी महाराजांनी ध्वनी, प्रकाश व जलनीतीचा वापर कशाप्रकारे केला हे विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. शिवरायांचे परराष्ट्र धोरण, हिंदवी पदपादशाही निर्मितीच्या मागील प्रेरणा व संकल्पना यांचे अभ्यासपूर्ण रित्या विश्लेषण करताना आकाशात चंद्र-सूर्य असेपर्यंत समाजाला शिव विचारांची गरज असणार आहे व शिवजयंती साजरी होत राहील असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयातील इतिहास विभागाद्वारे दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव रूपाने साजरी केली जाते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा व तरुण मनावर राष्ट्रवादाचे संस्कार व्हावेत म्हणून विविध स्पर्धांचे या निमित्ताने आयोजन केले जाते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधने यांनी भुषविले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यावर घेण्यासारखे तर आहेतच, पण ज्याने कोणी हे विचार डोक्यात घेतले तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. शिवरायांसारखे आपले आचरण असले पाहिजे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यामागील इतिहास विभागाची भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयीन तरुण-तरुणीं समोर राष्ट्रपुरुषांच्या चारित्र्याचा व चरित्राचा आदर्श ठेवला तर राष्ट्र उभारणीसाठी उद्या हेच विद्यार्थ्यांची महत्त्वाचे योगदान देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रा.अशोक डिंबर यांनी रविवार सुट्टीचा दिवस असून देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित राहिल्या बद्दल त्यांचे आभार मानले. प्रा.अमित निकम यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. इतिहास विभागातील प्रा. डॉ. धनंजय पवार, प्रा.स्वामी पवार तसेच यीन प्रतिनिधि ऋषिकेश खैरनार, ओम सोनवणे, अनिकेत सोनवणे, सारंग पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.